16 ठार, 119 जण जखमी, तालिबानबरोबरच्या वाटाघाटींची प्रक्रिया धोक्यात
काबुल: अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठा बॉम्बस्फोट झाला. अफगाणिस्तानत सक्रिय असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालये आणि अतिथीगृहे असलेल्या भागातच हा स्फोट् झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेले 5 हजार सैन्य मघारी घेण्याबाबतच्या योजनेबाबत अमेरिकेच्या दूतांनी अफगाण सरकारला माहिती दिल्याच्या काही तासांमध्येच हा स्फोट झाला.
तालिबानबरोबर झालेल्या चर्चेनंतर निश्चित करण्यात आलेल्या वाटाघाटींनुसार काही महिन्यांच्या आत सैन्य माघारी घेण्याबाबतच्या योजनेला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयाला तत्वतः एकमत झाले आहे. मात्र या निर्णयावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज झालेल्या स्फोटात काबुलमधील ग्रीन व्हिलेज या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या कुंपणाच्या भिंतीचे नुकसान झले असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नुसरत रहमी यांनी सांगितले. हा स्फोट कार बॉम्बने घडवून आणण्यात होता, असे अन्य प्रवक्त्याने सांगितले. या स्फोटामध्ये किमान 16 जण ठार झाले, तर 119 जण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटात परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. स्फोटामुळे प्रक्षुब्ध झालेल्या नागरिकांनी संघटनेच्या भिंतींना आग लावली.
अमेरिकेच्या आणि अफगाणी सैन्याकडून तालिबानच्या ताब्यातील रहिवासी भागात अलिकडेच केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हा बॉम्बस्फोट् केला गेल्याचे तालिबानी प्रवक्त्याने म्हटले आहे. नागरिकांनी ग्रीन व्हिलेजसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालये असलेल्या भागात राहू नये, अशी सूचनाही तालिबानने नागरिकांना केली आहे.