महापौरांच्या प्रभागात सल्लागारांना पायघड्या 

नऊ कामांसाठी सल्लागार : प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

पिंपरी – सल्लागारांवरील उधळपट्टीला लगाम लावण्याची वल्गना करुन सत्तेवर आलेल्या भाजपच्या काळात सल्लागारांची चांगलीच चांदी झाली आहे. चहुबाजूनी टीकेचा भडीमार होत असतानाही “सल्लागार प्रेम’ काही केल्या कमी होत नाही. आता महापौर राहुल जाधव यांच्या प्रभागात विविध कामांसाठी नऊ सल्लागार नेमण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

सल्लागारांवरील करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवू, वाढीव खर्चाला लगाम लावू, अशा अनेक सवंग घोषणा करीत भाजपने सत्तेचा सोपान गाठला. मात्र, आता मात्र कोणत्या कामासाठी सल्लागार नेमावा, यासाठी कोणतीही नियमाची चौकट उरली नाही. महापालिकेत गलेलठ्ठ वेतनावर तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा फौजफाटा असतानाही एकेका सल्लागारांवर लाखोंची उधळपट्टी केली जात आहे. या सल्लागारांनी नेमका कोणता सल्ला दिला, त्याचा महापालिकेला काय फायदा झाला, याचे कोणतेही दस्ताऐवज करदात्यांसमोर येत नाही. आता तर महापौर राहुल जाधव यांचा प्रभाग असलेल्या चिखली-कुदळवाडीमध्ये विविध कामांसाठी नऊ सल्लागार नेमण्यात येणार आहेत. त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने उद्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

यामध्ये जाधववाडीतील आरक्षण विकसित करण्यासाठी किमया असोसिएटस्‌, बोऱ्हाडेवाडीतील आरक्षणावर शाळा इमारत बांधण्यासाठी ज्योती पानसे असोसिएटस्‌, भैरवनाथ मंदिर ते विसावा चौक ते आळंदी रस्ता 30 मीटर विकसित करण्यासाठी कावेरी प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, शिवरस्ता ते वडाचा मळा ते कुदळवाडी 30 मीटर रस्ता विकसित करण्यासाठी एन्व्हायरोसेफ, चिखलीतील आरक्षण क्रमांक 1/143 विकसित करणे व स्थापत्य विभागातील विकास कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अनिरुद्ध वैद्य व असोसिएटस्‌, जाधववाडी कमानीपासून आहेरवाडी चौकापर्यंतचा रस्ता अद्यावत पद्धतीने करण्यासाठी ऑरबिट इन्फ्रा टेक सोल्युशन्स, चिखली गावठाणातील रस्ते विकसित करण्यासाठी एनव्हायरोसेफ कन्सल्टंटस्‌, चिखलीतील शिवरस्ता ते मधला पेठ पर्यंतचा 18 मीटर रस्ता रुंदीकरणासाठी पेव्हटेक, सेक्‍टर क्रमांक 16, राजे शिवाजीनगर मधील रस्ते विकसित करण्यासाठी कावेरी प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट या सल्लागार संस्थेची नेमणूक केली जाणार आहे.

पुतळा उभारणीसाठीही सल्ला

या व्यतिरिक्‍तमोशी येथे छत्रपती संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा उभारण्यासाठी सल्लागार म्हणून सृष्टी डिझाईन्स, चऱ्होलीतील प्रभाग क्रमांक 7 मधील साईनाथ कॉलनी, अक्षयनगर परिसरात सुमारे दहा कोटी रुपये खर्चून रस्ते विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी एन्वाहरोसेफ या ठेकेदार संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक केली जाणार आहे. एकूण प्रकल्प खर्चाच्या सुमारे दोन टक्‍क्‍यापर्यंतचा खर्च या सल्लागारांना दिला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.