उमेदवारीची कुस्ती चितपट करण्यासाठी डावपेच
मुलाखतीमुळे मावळातील राजकीय वातावरण तापले
इच्छुकांचा आकडा फुगविण्याची “खेळी’
पिंपरी – विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर भारतीय जनता पक्षात मुलाखतींचा सिलसिला सुरू झाला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे पक्ष निरीक्षक, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 26) मुलाखती घेतल्या. बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ विधानसभा मतदारसंघात मुलाखतीच्या दिवशी कमालीचे “महानाट्य’ घडले. ऐनवेळी इच्छुकांची संख्या थेट 14 वर पोहोचली. त्यामुळे फुगलेल्या आकड्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या दावेदारांची ही संख्या “मुरब्बी मंडळीं’ची राजकीय खेळी मानली जात आहे.
मावळकडे भाजपचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते. तालुक्यात गेली 25 वर्षे “कमळ’ फुलले. रुपलेखा ढोरे, दिगंबर भेगडे आणि बाळा भेगडे यांनी केंद्रात आणि राज्यात आघाडीचे सरकार असतानाही “मावळ’वर वर्चस्व राखले. भाजपचा दबदबा कायम ठेवत निवडणुकीत नेहमी कॉंटे की टक्कर देणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या रांगेत राहिली. परिणामी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा कडव्या संघर्षाबरोबरच स्थानिक भाजप नेतृत्त्वाची खेळी वरचढ राहिली.
भाजपचे पक्ष निरीक्षक आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.26) मावळ विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस सचिन सदावर्ते उपस्थित होते. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ विधानसभा मतदारसंघात मुलाखतीच्या दिवशी इच्छुकांची संख्या वाढविण्याचा “महापॉलिटिकल ड्रामा’ घडला. त्यामुळे मुलाखतींच्या फुगलेल्या आकड्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.
विधानसभेच्या आखाड्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीकडून पक्षश्रेष्ठी राजकीय आखाड्यात पैलवान म्हणून आपल्यालाच संधी देतील, या आशेवर इच्छुकांची धडपड सुरू दिसते. पक्षनेतृत्त्वाची मतदारसंघातील चाचपणी, स्थानिकांची मोर्चेबांधणी राजकीय घडामोडी ठळकपणे दिसत आहे.
मावळमध्ये भाजपचेच “कमळ’ फुलते, असा गेल्या 25 वर्षांचा इतिहास आहे. दिगंबर भेगडे यांनी आमदारकीच्या दोन टर्म घेतल्यानंतर पक्षाने अनपेक्षितपणे आमदार बाळा भेगडे यांना 2009 मध्ये विधानसभेसाठी “चाल’ दिली. पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला तडा जावू न देता भाजप कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करीत बाळा भेगडे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. आता बाळा भेगडे यांच्याही दोन टर्म पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अन्य इच्छुकांच्या आशेला “पालवी’ फुटली आहे.
आमदार बाळा भेगडे यांच्यासह तळेगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, “भाजयुमो’चे माजी तालुकाध्यक्ष, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे हे तीन प्रमुख आघाडीवर आहेत. त्यात आता आणखी भर पडली आहे. मुलाखतींचा फुगलेला आकडा “प्रबळ’ दिसत नसला तरी त्यामागे राजकारण आहे, हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही. इच्छुकांची रांग दिसत असली तरी प्रत्यक्षात राज्यमंत्री बाळा भेगडे, सुनील शेळके आणि रवींद्र भेगडे हे भाजपचे प्रबळ इच्छुक मानले जातात. आता या तिघा इच्छुकांचा “समेट’ घडविली नाही, तर भाजपची राष्ट्रवादी व्हायला वेळ लागणार नाही, याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केला पाहिजे.
आम्ही उमेदवारीच्या आखाड्यात…
राज्यमंत्री, विद्यमान आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी पक्षाकडे तिसऱ्यांदा संधी द्या, अशी मागणी केली आहे. भेगडे यांच्याशिवाय तळेगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे या दोन प्रबळ दावेदारांनीही सोमवारी उमेदवारीसाठी मुलाखत दिली.या तिघांबरोबरच भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती एकनाथ टिळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले तसेच भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेते शंकरराव शेलार, भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सुकन बाफना, तळेगाव नगरपरिषदेचे पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, युवानेते जितेंद्र बोत्रे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल.