आर्मी वेशातील व्यक्‍तीची वानवडीत भीती; अचानक होतो गायब

पुणे – वानवडी परिसरात आर्मीचा वेश परिधान केलेल्या अज्ञात व्यक्‍तीने दहशत निर्माण केली आहे. ही व्यक्‍ती रात्री अंधारात कोणाच्याही घरात घुसत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. हा व्यक्‍ती चपळ असून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने निघून जातो. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वानवडी पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी कोंम्बिंग ऑपरेशन केले. तसेच परिसरातील गस्त वाढवण्यात आली आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मीचे कपडे परिधान केलेली 6 ते साडेसहा फूट उंच व्यक्‍ती सोमवारी रात्री भोसले वाडा या ठिकाणी दिसला तर मागील दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार आहनावे वाडा येथे घडला. तसेच 15 दिवसांपूर्वी भैरोबा मार्ग 4 नंबर बंगला येथील एका घरात हीच व्यक्‍ती घुसली होती. रात्रीच्या वेळी अचानक ही व्यक्‍ती परिसरातील कोणत्याही घरात घुसण्याचा प्रयत्न करते. तर काही वेळातच भिंतीवरून उड्या मारून गायब होत आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना प्राप्त झाले आहेत.

अचानक होतो गायब
परिसरातील काही नागरिकांना एक माणूस आर्मीच्या ड्रेसमध्ये रात्री अंधारात दिसला आहे. परंतु, आतापर्यंत त्याच्याकडून कोणताही वाईट प्रकार घडलेला नाही. करण्याची शक्‍यता असल्यामुळे माथेफिरू किंवा डोक्‍यावर परिणाम झालेल्या व्यक्‍ती सारखा तो दिसतोय. त्याला पकडण्यासाठी पोलीस दोन दिवस रात्रभर फिरत होते. तो अचानक गायब होतो. वानवडी बाजार परिसरात तो दिसला होता. सर्वांना याची माहिती दिली आहे. लवकरात लवकर त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आत्माराम शेटे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.