कुरकुंभ – येथील औद्योगिक वसाहतीमधील मोडेप्रो इंडिया प्रा. लि. या कंपनीतील थाईनायल क्लोराईड या रसायनाने भरलेल्या ड्रममधून रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून औद्योगिक सुरक्षा अधिकाऱ्याने ही कंपनी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक वसाहतीमधील मोडेप्रो प्रा. जल. या कंपनीतील थाईनायल क्लोराईड या केमिकलने भरलेले ड्रममधून अचानक गळती झाल्याने या कंपनीच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. रविवारी (दि. 25) दुपारच्या वेळेस ही घटना घडली. गेल्या आठवड्यातील आगीची घटना ताजी असतानाच आज झालेल्या वायू गळतीने येथील नागरिकांमध्ये कंपनीतील सुरक्षिततेबाबत शंका निर्माण झाली आहे.
घटनांची मालिका सुरूच मागील आठवड्यात अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीमध्ये झालेल्या आगीच्या भीषण स्फोटामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता, आगीची तीव्रता अधिक असल्याने कुरकुंभ तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले होते. या घटनेची वरिष्ठांनी दखल घेत ही कंपनी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांना सुरक्षितेबाबत गांभीर्य नाही, त्यामुळे बहुतांश केमिकल कंपन्यांमध्ये स्फोट, आग लागणे, वायू गळती अशा घटनांची मालीका सुरूच आहे. घडलेल्या दुर्घटना नेहमी गुलदस्त्यात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. घटनेची तीव्रता अधिक नसली तरी यामुळे येथील कामगार भयभीत होत असून, अशा दुर्घटनांवर नियंत्रण मिळविणे गरजेचे बनले आहे.
मोडेप्रो कंपनीतील रसायन गळतीच्या घटनेची माहिती गावातील लोकांकडून समजली. सध्या कुरकुंभ येथील आगीच्या, स्फोटांच्या, रसायन गळतीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने या घटनेची माहिती घेत आहे. ही घटना छोटी असली तरी, कंपनी बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
अखिल घोगरे, उपसंचालक औद्योगिक आणि आरोग्य सुरक्षा विभाग पुणे