पिंपरी, (प्रतिनिधी) – एमआयडीसीमध्ये छोट्या उद्योजकांना भूखंड मिळत नाही. तो उपलब्ध करून देण्याची मागणी केली फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष गोविंद पानसरे यंनी पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली. तर, लघु उद्योग जर देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असेल तर त्यांना आवश्यक सेवा सुविधा त्वरेने पुरवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी दिल्याची माहिती पानसरे यांनी दिली.
नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.त्यास औद्योगिक विभागाशी निगडीत सर्व अधिकारी तसेच रोजगार स्वंयरोजगार विभाग जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृषाली सोने, औद्योगिक संघटनाचे पदाधिकारी दिलीप बटवाल, प्रमोद काकडे, पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, गोविंद पानसरे आदींनी सुहास दिवसे यांचा सत्कार केला.
या वेळी एमआयडीसीमधील छोट्या उद्योजकांना भूखंड मिळत नाही, तो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पानसरे यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी दिवसे यांनी भूमी संपादन अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सयुंक्तरित्या जलद भूसंपादन करून भूखंड मागणीप्रमाणे द्यावेत. मुलभूत सेवा सुविधा त्वरेने उपलब्ध करून द्याव्यात. सेक्टर ७ व सेक्टर १० मध्ये रस्ते, वीज, ड्रेनेज उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
या वेळी पानसरे यांनी विविध खात्यातील नियोजन अभावाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जिल्हाधिकारी यांनी एमआयडीसी, भूमी संपादन अधीन पीएमआरडीए, महावितरण, पीएमपी, पीसीएमसी आधिकाऱयांसमवेत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्याचे आदेश दिले. दिलीप बटवाल यांनी आभार मानले.