पिंपरी, (प्रतिनिधी) – ज्यादा नफ्याचे अमिष दाखवून तीन जणांची 57 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना तापकीर नगर, मोशी येथे घडली. राजेश रघुनाथ आमले (वय 43, रा. पिंपळे गुरव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ११) फिर्याद दिली आहे.
जितेंद्र मनोहर बल्लाडकर (वय 48, रा. तापकीर नगर, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने यंत्र कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये एक लाख गुंतवणूक केल्यास प्रति महिना दहा हजार रुपये जास्तीचा नफा आणि बारा महिन्याचे मिळून एक लाख वीस हजार रुपये नफा आणि मूळ मुद्दल एक लाख रुपये असे दोन लाख २० हजार रुपये परतावा मिळेल, अशी आकर्षक योजना सांगितली.
ज्यादा नफ्याचे अमिष दाखवून फिर्यादी आमले यांचा विश्वास संपादन करत त्यांना 43 लाख रुपये यंत्र कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तसेच आजपर्यंत आरोपी जितेंद्र याने केवळ पाच लाख रुपये लाभांश फिर्यादीच्या भावाच्या खात्यावर आरटीजीएस द्वारे परत दिले.
त्यानंतर नफा, परतावा, लाभांश व मूळ मुद्दल परत न करता फिर्यादी यांची 38 लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच फिर्यादी यांचा मित्र सचिन घोलप याचे दहा लाख 21 हजार रुपये व वाजिद शेख याचे नऊ लाख 50 हजार रुपये असे एकूण 57 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक केली.