जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड : सप्टेंबर महिन्यात कझाकिस्तान येथे रंगणार स्पर्धा
पिरंगुट – येथील महिला कुस्तीगीर कोमल गोळे हिची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे पिरंगुट गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लखनौ येथे भारतीय कुस्ती महासंघातर्फे निवड चाचणी घेण्यात आली त्यात कोमलने हे यश मिळवले. त्यामुळे तिची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी 72 किलो वजनी गटात भारतीय संघाकडून निवड झाली आहे. अंतिम फेरीत कोमलने हरियाणाच्या महिला मल्लावर 3-2 ने विजय मिळवत भारतीय संघात आपले स्थान पक्के केले.
कझाकिस्तान येथे 14 ते 22 सप्टेंबर या कालावधीत जागतिक कुस्ती स्पर्धा होत आहे. गतवर्षीच्या सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत तिने पदक मिळवले आहे. मूळची पिरंगुटची असलेली कोमल राष्ट्रकुल कुस्ती संकुल कोल्हापूर येथे वस्ताद राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे.