पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणातील संशयित विक्रम भावे याचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी शनिवारी हा आदेश दिला. गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
या प्रकरणात यापूर्वी बचाव पक्षाचे वकील संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर केला आहे. ऍड. पुनाळेकर यांनी आरोपी शरद कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्र तुकडे करून फेकून दिल्याचा निष्कर्ष काढत पुनाळेकर यांना अटक झाली. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांनी केलेला जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली आहे, असा दावा सीबीआयने केला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी शरद कळसकर याने दुसऱ्या प्रकरणाच्या तपासात दिलेल्या कबुलीजबाबावरून भावे याला मे महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानेही न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केल अहोता. “भावे हा ऍड. पुनाळेकर यांच्याकडे कामाला होता. त्याचा या गुन्ह्याशी काही संबंध नसल्याने त्याला जामीन द्यावा,’ अशी मागणी बचाव पक्षाचे वकील ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली होती.
या अर्जाला सीबीआयचे वकील ऍड. प्रकाश सूर्यवंशी यांनी विरोध केला. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येवेळी भावे याने रेकी केली होती. त्यामुळे या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. एका खटल्यामध्ये त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी ऍड. सूर्यवंशी यांनी केली.