शिवामृत दूध सहकारी संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांची माहिती
अकलूज – सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचे महापुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. पलूस तालुक्यातील चोपडेवाडी हे गाव दत्तक घेण्यात आल्याची माहिती शिवामृत दूध सहकारी संघाचे चेअरमन धैर्यशिल मोहिते- पाटील यांनी दिली.
अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्या निर्णयानुसार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभा पार पडली.
यावेळी जमा रोख रक्कम व जीवनावश्यक मदत साहित्यांचे नियोजन व वितरणाची अडचण यावर विजयदादांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. माळशिरस तालुक्यातील विविध सार्वजनिक, शैक्षणिक व सहकारी संस्था, पंचायत समिती, ग्रामपंचायत व नगरपरिषदा व स्वयंसेवी संस्था, सामाजिक, युवक व महिलांच्या संघटना वतीने चोपडेवाडी हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यावर तात्काळ पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते – पाटील यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी चोपडेवाडी गाव दौरा करून माहिती घेतली. तेथील सरपंच, सर्वपक्षीय नेते यांच्याशी चर्चा केली. भविष्यात समस्या व त्यावर कायमची उपाययोजना यासाठी कटिबद्ध असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले. शुद्ध पाण्यासाठी शिवामृतच्या वतीने एक महिनाभर टॅंकरची व्यवस्था केली आहे.
तीन महिन्यांसाठी कोरडे शिधा 350 कुटुंबात दोन दिवसांत पुरवला जाईल. आरोग्यासाठी शनिवारी व रविवारी हेल्थ चेकअप कॅम्प तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाडीसाठी शालेय साहित्य. बोअर व आरो प्लांटसह तरतूद केली जाणार आहे.
माळशिरस तालुक्यातील ठोस मदत ही चोपडेवाडीसाठी भरीव आणि लोकांचा स्वाभिमान शाबूत राहील अशीच व्हावी, या भावनेने व्हावी म्हणून करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.