देऊळगावराजे – शिरापुर (ता.दौंड) येथील भीमा नदी वरील शिरापूर-सिद्धटेक रस्त्यावरील पुलाचा स्लॅबवरील सिमेंट कॉंक्रिटीकरण पुराच्या पाण्यात वाहून गेले असून तडेही पडल्यने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
या परिसरात सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात. मात्र, शिरापुर-सिद्धटेक पुलावरून वाहतूक बंद करण्यात आल्याने सिद्धीविनायकाच्या दर्शनाकरीता मोठा वळसा मारून जावे लागत आहे. धरण क्षेत्रात जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने भीमा नदीला पूर आल्याने या पुलावरील वाहतूक बंद होती, पाणी काहीसे कमी झाल्यानंतर या पुलाला तडे गेल्याचे निदर्शना आल्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे येथे सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. विद्यार्थी जीवमुठीत घेऊन याच पुलावरून ये-जा करीत असल्याने त्यांच्या जीवाला मोठा धोका आहे. शिवाय या भागातील दूध वाहतूक मोठ्या वाहनांऐवजी दुधाचे केन पुलावरुन ट्रॉलीच्या साहाय्याने ढकलत नेले जात आहेत. पुलावरुन एकेरी वाहतुक सुरू करावी, पुलाचे ऑडिट होऊन योग्य ती दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.