पाटणा – प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणने विजय संपादित केला आहे. पूर्वार्धात पिछाडीवर असूनही शेवटपर्यंत जिगरबाज खेळ करीत पुणेरी पलटणने बलाढ्य गुजरात फॉर्च्युनजाएंट्सला 33-31 असा पराभवाचा धक्का दिला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये विजयी वाटचाल राखली.
पाट्लीपुत्र क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत गुजरातने पुण्याविरुद्ध झकास सुरुवात केली होती. त्यांनी पकडी व चढायांवर योग्य नियंत्रण ठेवले होते. मध्यंतराला त्यांच्याकडे 17-14 अशी आघाडी होती. मात्र, उत्तरार्धात पुण्याच्या खेळाडूंना लय सापडली. त्यांनी 22 व्या मिनिटाला लोण नोंदवित आघाडी मिळविली.
तेथूनच सामन्याचे पारडे त्यांच्या बाजूने झुकले. त्यातच गुजरातच्या खेळाडूंनी केलेल्या चुकांचाही त्यांना फायदा झाला. पवन काडियन, अमितकुमार व गिरीश एरनाक यांनी प्रत्येकी 6 गुण मिळवित पुण्याच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. मनजितने 5 गुण मिळवित त्यांना यथार्थ साथ दिली. गुजरातच्या सचिनने 9 गुण तर रोहित गुलियाने 6 गुण मिळविले.