पुणे – राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महत्त्वाची असलेली 13 वर्षाखालील राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेस गुरुवारपासून येथे प्रारंभ होत आहे. त्यामध्ये विविध ठिकाणच्या 430 खेळाडूंनी भाग घेतला आहे.
मॉडर्न क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन गुरुवारी सकाळी 9 वाजता ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी 10 व 13 वर्षाखालील मुले व मुली असे वयोगट ठेवण्यात आले आहेत. 10 वर्षाखालील मुलांच्या एकेरीकरिता यश सिन्हा व सचित त्रिपाठी यांना अनुक्रमे पहिली दोन मानांकने देण्यात आली आहेत. मुलींमध्ये दर्शिता राजगुरू व फिझा अकबानी यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय मानांकन मिळाले आहे.
मुलांच्या 13 वर्षाखालील गटात यशराज कदमला अग्रमानांकन मिळाले असून आर्यवीर देशमुख याला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. दुहेरीत देशमुख व अजिंक्य गाडेकर यांनी अव्वल मानांकन मिळविले आहे तर अर्जुन भगत व कदम हे द्वितीय मानांकित जोडी राहणार आहे.
मुलींच्या 13 वर्षाखालील गटात रक्षा कंदस्वामी व नैशा भाट्ये यांना अनुक्रमे पहिली दोन मानांकने मिळाली आहेत. दुहेरीत श्रावणी वालेकर व तारिणी सुरी यांनी अग्रमानांकन मिळविले आहे. दुसरे मानांकन कृष्णा सोनी व कुंजल मंडलिक यांना देण्यात आले आहे. स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून अनिरूद्ध जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.