औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या वजनापूर गावात आगळ्या-वेगळ्या अळ्या आढळून आल्या आहेत. झुंडीमध्ये चालताना सापाप्रमाणे दिसत असल्याने स्थानिकांमध्ये याची चर्चा रंगली असून भीतीचे वातावरणही पसरले आहे. या रहस्यमयी अळ्यांना पाहून कृषी अधिकारीही अचंबित झाले आहेत. या अळ्या नेमक्या कुठून आल्या याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही.
अळ्यांची झुंड एका रांगेत चालत असून जवळपास ५ फुटांपासून ते १०० फुटांपर्यंत अळ्यांची असते. दुरून सापासारखी दिसणारी ही रांग जवळ गेल्यानंतरच अळ्या असल्याचे समजते. धक्कादायक म्हणजे या अळ्या घरात येत असल्याने गावकऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. अनेकांनी गेल्या दोन दिवसांपासून रॉकेल, कुणी पेट्रोल तर कुणी पिकांवर मारणारे औषध टाकून या अळ्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आयुष्यात अशा अळ्या पहिल्यांदाच पाहिले असल्याचे गावकरी सांगत आहेत. या अळ्या जमिनीतून निघून वेगवेगळे आकार ही करत दाखवत आहेत.
अळीची माहिती मिळताच किटक अभ्यासकांनीही गावाला भेट दिली. त्यांनी अळ्यांची पाहणी केली असता फंगसवर्म प्रकारातील या अळ्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काही दिवसात त्या आपोआप कमी होतील, असेही त्यांनी सांगितले आहे.