मांडवगण फराटा – धनगर आरक्षण हे मिळणारच असून देवाच्या साक्षीने सांगतो की, धनगर आरक्षणाचा प्रश्न हा कोणत्याही जातीतील म्हणजेच एसटी जातीतील समाज बांधवांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाज बांधवांना एसटी आरक्षणाच्या सवलती मिळणार आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. मराठा आरक्षण हे कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता कोर्टाच्या निर्णयानुसार पार पडले. कारण यापूर्वीच्या सरकारने भक्कम असे आरक्षण कोर्टामध्ये न मांडल्यामुळे ते आरक्षण कोर्टामध्ये टिकले नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 च्या इमारतीचे तसेच शिरसगाव काटा येथील स्थलांतरित दवाखान्याचा उदघाटन समारंभ जानकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाबूराव पाचर्णे होते.
जानकर म्हणाले की, शासनाने दुधाला पाच रुपये वाढवून पंचवीस रुपये बाजारभाव केल्यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आहे. शहरी भागातील पाचही पशुवैद्यकीय दवाखाने हे शिरूर तालुक्यासाठीच आले आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक हे न्हावरे या ठिकाणी बांधण्यात येणार आहे.
जानकर म्हणाले की, कायद्याच्या कचाट्यातमध्ये धनगर आरक्षण रखडले आहे. चुकीचा अहवाल दिल्यामुळे हे आरक्षण मिळाले नाही. धनगर आरक्षण मिळण्यासाठी कमिशन नेमलेले असून अहवाल येणे बाकी आहे. धनगर समाज बांधवांना आरक्षण देण्यास हे शासन कटिबद्ध आहे. यावेळी श्री संतराज महाराज देवस्थान ट्रस्टचे चोपदार साहेबराव लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शिरूर अध्यक्ष भगवानराव शेळके, रासपाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख दादासाहेब केसकर, शरद निंबाळकर, रासपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे, रामकृष्ण बिडगर,भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा वैजयंतीताई चव्हाण, घोडगंगाचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, भाजप उपाध्यक्ष संभाजीराव लोखंडे, सरपंच उत्तम लोखंडे, उपसरपंच पंकज रणदिवे, सरपंच प्रमोद रणदिवे, माजी सरपंच राजेंद्र रणदिवे, माजी उपसरपंच अजित शितोळे, माजी उपसरपंच राहुल रणदिवे, माजी उपसरपंच सुधीर राक्षे, माजी उपसरपंच अरुण भोसले, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष प्रमोद विजय रणदिवे, पत्रकार तुकाराम पठारे, एकनाथ शेलार, ग्रामस्थ उपस्थित होते.