पंढरपूर बाजार समितीमधील फटाक्याच्या गोदामालासुद्धा भीषण आग
सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी एकूण तीन ठिकाणी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंढरपुरातील बाजार समितीमधील फटाके ठेवलेल्या गोदामाला रविवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत कोणताही अनर्थ घडला नाही. मात्र आगीत साहित्य जाळून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
तर सोमवारी सकाळी रंगभवन परिसरातील एकूण 16 दुकानांना भीषण आग लागून फर्निचरसह लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील दोन टॉवेल कारखान्यांना आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी दिली.
अग्निशमन दलास रंगभवन येथील आगीची वर्दी पहाटे सव्वातीनच्या सुमारास आली. त्यावेळी अग्निशमन पथक एमआयडीसीमधील टॉवेल कारखान्यांना लागलेली आग विझवत होते. अग्निशमन दलाच्या पथकाने रंगभवन परिसरात धाव घेतली. तोवर बरीच दुकाने पेटली होती. ही दुकाने रंगभवन चौकातील फस्ट चर्चसमोर आहेत. या ठिकाणी फर्निचर, शोभेच्या वस्तू विक्रीची दुकाने आहेत. काही वेळातच दुकाने जळून खाक झाली. पाण्याचा मारा करून मागील बाजूस असलेली दुकाने आगीपासून वाचवण्यात यश आले आहे. सकाळपर्यंत आग विझवण्याचे काम सुरु होते. आगीची माहिती समजताच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे आणि महापौर शोभा बनशेट्टी यांनी भेट देऊन पाहणी केली.