नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची बदनामी करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले मुक्त पत्रकार प्रशांत कनोजीया यांच्यावरील कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. या अटकेच्या विरोधात कनोजीया यांच्या पत्नीने दाखल केलेली याचिका आज सुटीकालीन खंडपीठापुढे सुनावणी साठी आली.
आपल्या अशिलाला बेकायदेशीर व घटनाबाह्यरित्या अटक करण्यात आली असून त्याची तातडीने सुनावणी होण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यांच्या वकिलांने केले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने उद्या त्या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. पत्रकार कनोजीया यांना करण्यात आलेल्या अटकेचा एडिटर गिल्ड ऑफ इंडिया आणि अन्य पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे.
एका महिलेने आपण मुख्यमंत्र्यांना विवाहाचा प्रस्ताव दिला असल्याचा दावा केला होता. व आपल्याला त्यांच्याशी विवाह करायचा आहे असे ती महिला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर विविध वाहिन्यांच्या पत्रकारांना सांगत असल्याचा व्हिडीओ या पत्रकाराने सोशल मिडीयावर शेअर केला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांची बदनामी केली या कारणावरून उत्तरप्रदेश पोलिसांनी काल कनोजीया यांनी अटक केली आहे.