तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा
पिंपरी – मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुण्यातील कचरा टाकण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला विरोध करत, जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीतील ग्रामस्थांनी रविवारी (दि.9) मोशीतील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच्या सर्व व्यापारी व ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवून सहभाग नोंदविला.
पिंपरी-चिंचवड शहराचा कचरा मोशी डेपोत टाकला जात आहे. दररोज टाकल्या जाणाऱ्या शेकडो टन कचऱ्यामुळे या परिसरात कमालीची दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अक्षरश: नाक मुठीत धरून रहावे लागत आहे. या डेपोतील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे मोशीसह चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडीसह इंद्रायणीनगर, संतनगर परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. हे कमी की काय म्हणून शासनाच्या मोशी येथील मालकीच्या जागेत पुण्याचा कचरा आणून टाकण्याच्या हालचालींनी चांगलाच वेग घेतला आहे. याला विरोध करण्यासाठी गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी बैठक घेतली होती. या बैठकीत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज (दि.9) गाव बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.
मोशीत पुण्याचा कचरा नकोच, अशी मोशी ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे. शहरातील कचऱ्याने नको-नको झाले असतानाच आता पुण्याच्या कचऱ्याने त्यामध्ये आणखी भर पडणार आहे. त्यामुळे याला विरोध म्हणून मोशी गावच्या हद्दीतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून नागरिक बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या बंदमुळे वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. सायंकाळी पाचनंतर किरकोळ व्यवहार सुरू झाले.
मोशीतील नागेश्वर महाराज मंदीरात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. त्यामध्ये आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे यांनी ग्रामस्थांची भूमिका समजून घेतली. तसेच पुण्याचा कचरा मोशीत टाकण्यास विरोध दर्शविला. शासनाने हा निर्णय रद्द न केल्यास, याविरोधात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोशी उपबाजार बंद मुळे व्यापाऱ्यांची गैरसोय
मोशीगावच्या हद्दीत असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नागेश्वर महाराज उपबाजार समितीमधील व्यापारी व आडतदारांनी या संपाला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे या उपबाजारात पहाटेपासून एकही तरकारी वाहन येऊ न शकल्याने उपबाजारातील संप 100 टक्के यशस्वी ठरला. एरवी ग्राहकांनी गजबजलेल्या उपबाजार समिती परिससरात शुकशुकाट जाणवत होता.
सलग दोन दिवस दोन ठिकाणी बंद
विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या साने चौकातील संपर्क कार्यालयावर गुरुवारी सशस्त्र हल्ला करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ शनिवारी चिखलीत बंद पाळण्यात आला होता. या भागातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. तर पुण्याचा कचरा मोशीत टाकण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवित, मोशी ग्रामस्थांनीदेखील बंद यशस्वी करुन दाखविला. शहरातील दोन परिसरात सलग दोन दिवस झालेले बंद शंभर टक्के यशस्वी ठरले.