कोपरगाव: कोपरगाव शहरातील प्राधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या 211 घरकूल लाभार्थींच्या कामाचा आढावा आमदार स्नेहलता कोल्हे यांनी घेतला. या बैठकीस प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदी उपस्थित होते. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत सहभाग द्यावा, असे आवाहन केले.
यावेळी आ. कोल्हे म्हणाल्या की, याचा फायदा जास्तीत जास्त गरजु लोकांना मिळणेसाठी नगरपालिका प्रशासनाने अधिक लक्ष घालावे. सरकारी जागेवर राहणारे नागरीक यापासून वंचित असल्यामुळे त्यांना याचा लाभ मिळण्याकरीता शासनाने लवकरात लवकर सदरच्या जागा नियमाकूल करून संबंधितांना न्याय द्यावा. या बैठकीस उपनगराध्यक्ष विजय वाजे, सर्व नगरसेवक, बांधकाम अभियंता सुराळकर, प्रधानमंत्री घरकूल आवास योजना सर्व्हेक्षण अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रातांधिकारी गोविंद शिंदे म्हणाले, नगरपालिकेने डोअर टु डोअर सर्व्हे करून, जास्तीत जास्त नागरिकांना याचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत. पूर रेषेत येणाऱ्या रहिवासीयांचा सर्व्हे स्वतंत्ररित्या करून, त्यांना या योजनेचा फायदा कसा मिळेल, यासाठी प्रस्ताव तयार करावा.
या योजनेत पुर्वीच्या यादीत काही नागरिकांचा समावेश होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही नावे समाविष्ठ झालेली नाही, अशी नावे शोधून तसा प्रस्ताव नगरपालिकेमार्फत आपल्याकडे पाठवावा, असेही शिंदे म्हणाले. राघोबादादा वाडाशेजारी 22 कुटूंबे अतिक्रमीत जागेत राहतात. त्यांचे पुर्नवसन या योजनेत करून घेण्यासाठी नगरपालिकेने प्रयत्न करावेत. यावेळी आमदार कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोपरगाव ग्रामिणचा त्रिशंकु भाग शहर हद्दवाढीत समावेश झालेला असल्याने, त्या भागातील रहिवाश्यांना नागरी सुविधा मिळण्यासाठी नगरपालिकेने तत्काळ डीपीआर तयार करून घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. शहर विकासाच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही त्यांनी यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना सुचना केल्या. आभार उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी मानले.