आत्महत्येस भाग पाडणाऱ्या कथित पत्नीसह तिचा मित्र जेरबंद

तब्बल महिन्यानंतर गुन्हे शाखेला यश

लोणी काळभोर: उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तरुणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करून फरार झालेली त्याची कथित पत्नी या परप्रांतीय तरूणीसह तिच्या मित्रास स्थानिक गुन्हे शाखेचे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने तब्बल एक महिन्यांनंतर रांजणगाव (ता. शिरूर) येथे जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

याप्रकरणी भीमा बाबूराव गोरे (वय 27, रा. सिक्वे कॉलनी, नवी सांगवी, पुणे; मूळ रा. तुकडी सोनेसांगवी, ता. निलंगा, जि. लातूर) व त्याची मैत्रीण सोनाली गणेश जगताप (वय 23, सध्या रा. सातववाडी लोखंडी पुलाजवळ, हडपसर; मूळ रा. खिला पेट्रोलपंप, उदरानपूर जि. हावडा पश्‍चिम बंगाल) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गणेश जगताप हा मासे विक्रीचा व्यवसाय करीत होता. अडीच वर्षापूर्वी तो सोनाली नावाच्या मुलीला घरी घेऊन आला व तिच्याशी लग्न करायचे आहे असे घरच्यांना सांगून तिला पाच दिवस घरात ठेवले. त्यानंतर तिला घेऊन हडपसर येथे राहू लागला. 10 मार्च 2019 रोजी गणेशने आईला फोन करुन सांगितले की, “”मला सोनालीने घरातून हाकलून दिले आहे व घरातील गृहपयोगी साहित्य तिने व तिचे सोबतचा मित्र भीमा गोरे हे घेऊन गेले आहेत. एक महिन्यापूर्वी या दोघांनी माझ्याकडून फ्लॅटसाठी 4 लाख 50 हजार रुपये घेतले आहेत. तसेच आणखी पैसे घेऊन ये म्हणून वारंवार त्रास देत आहेत. माझ्याकडून घेतलेल्या कागदपत्रांचा उपयोग ते माझ्या नावावर कर्ज काढून फ्लॅट घेण्यासाठी करणार आहेत.” तेव्हापासून तो तणावाखाली होता. दरम्यान 6 मे 2019 रोजी त्याने राहत्या घरी आत्महत्या केली होती.

सोनाली व तिचा मित्र भीमा गोरे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता; परंतु दोघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहित नसल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करणेबाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, दत्ता तांबे, सचिन गायकवाड, राजू मोमीन, हवालदार ज्योती बांभळे, दैवशाला डमरे यांच्या पथकाने तपास करून फरारी आरोपींची माहिती काढून दोघांना रांजणगाव परिसरात सापळा रचून जेरबंद केले. अधिक तपास लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे हे करीत आहेत.


चिठ्ठीत लिहिले होते…

त्याच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीमध्ये, “”माझी पत्नी सोनाली ही भीमा गोरेबरोबर पळून गेली आहे. मी भीमाशी बोललो असता, त्याने मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्यामुळे माझ्या जीवनाचा खेळ झाला, बायकोला माझे प्रेम समजले नाही. ते दोघे माझ्या मृत्यूस कारणीभूत आहेत त्यांना सोडू नका” असे नमूद केलेले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.