विहिंपच्या तीन नेत्यांसह सुमारे 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा
पिंपरी – विश्व हिंदू परिषदेने रविवारी निगडीमध्ये विना परवाना काढलेल्या शोभायात्रेत सहभागी मुलींच्या हाती एयर रायफल आणि तलवारी देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात विहिंपचे तीन नेते आणि 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार निगडी येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान या दरम्यान सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान सुरू होता. याप्रकरणी, रविवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शरद इनामदार, धनाजी शिंदे, नितीन वाटकर व इतर 200 ते 250 जणाविरोधात भारतीय हत्यार कलम कायदा 4(25), मुंबई पोलीस अधिनियम 1957 चे कलम 37(1)(3) सह 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेचे शरद इनामदार, धनाजी शिंदे व नितीन वाटकर यांनी 200 ते 250 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निगडी येथील अंकुश चौकातून विनापरवाना शोभा यात्रा काढली. या शोभायात्रेत सहभागी मुलींच्या हातामध्ये एअर रायफल देऊन त्यातून आवाज काढण्यात येत होता. तसेच पाच मुलींच्या हातामध्ये तलवारी देऊन घोषणाबाजी करण्यात येत होती. ही शोभायात्रा निगडी येथील ठाकरे मैदानावर रात्री दहा वाजता पोहचेपर्यंत हा प्रकार सुरु होता. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी शहरात शस्त्रबंदीचे आदेश दिलेले असतानाही हा प्रकार सुरु होता. या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करीत आहेत.