पिंपरी – आकुर्डी रेल्वे स्थानकावरच 16 मे रोजी एका महिलेस प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. तिथे असणाऱ्या प्रवाशांकडून मदत होत नसल्याचे पाहत स्टेशन मास्तरांनी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवकांना संपर्क केला होता. त्यावेळी स्वयंसेवक तातडीन धावून आले होते. वेळीच मदत करुन महिला आणि नवजात शिशुचे प्राण वाचवणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक आणि पोलीस मित्रांचा महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अनूप मोरे सोशल स्पोर्टस फाउंडेशन व महापौर पिंपरी चिंचवड महापालिका यांचे संयुक्त विद्यमाने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, आर एस कुमार, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, सामाजिक कार्यकर्ते प्रसेन अष्टेकर आदी उपस्थित होते.
समिती अध्यक्ष विजयकुमार पाटील, संत साहित्याचे अभ्यासक मंगला घाळी, देवयानी पाटील, अर्चना दाभोळकर, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, अमित डांगे, जयप्रकाश शिंदे, जयेंद्र मकवाना, समीर चिले, तेजस सापरिया, नितीन मांडवे, मौसमी घाळी या दक्ष समिती पोलीस मित्र स्वयंसेवकांचा महापौरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.