पिंपरी – परिचारिका हा आरोग्य यंत्रणेतील सर्वात मोठा मजबूत कणा समजला जातो. परंतु, रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या परिचारिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयातील परिचारिकांचे कित्येक प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या लवकरात -लवकर सोडविण्याची मागणी, परिचारिकांनी “दै प्रभात’शी बोलताना केली.
प्रत्येक रुग्णाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देणाऱ्या परिचारिकांच्या मागण्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहेत. कायमस्वरुपी तत्वावर परिचारिकांची भरती करा, सिस्टर इनचार्जची रिक्त पदांची भरती करा, समान काम समान वेतन द्यावे, सहा महिन्यांसाठी सुरु असलेली मानधन तत्वावरील भरती बंद करा, परिचारिकांसाठी सुरक्षाव्यवस्था कडक करा, रुग्णालयातील वर्ग “ड’ पदांची संख्या वाढविणे, आयसीयू विभागात कार्यरत असणाऱ्या परिचारिकांना जादा भत्ता देणे यासारख्या कित्येक मागण्या सोडविण्याची आवश्यकता आहे.
शहरात महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय आहे. या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी शहर व जिल्हाभरातून नागरिक येतात. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णां ची संख्या पाहता परिचारिकांची संख्या अतिशय तोकडी आहे. वायसीएम रुग्णालयात सद्यस्थितीत कायमस्वरुपी तत्वावर 185 तर मानधन तत्वावर 184 परिचारिका आहेत.
परिचारिकांच्या मागण्या
– कायमस्वरुपी तत्वावर भरती करावी
– समान काम समान वेतन लागू करा
– “ड’ वर्गातील पदांची भरती करा
– अतिदक्षता विभागात काम करणाऱ्यांना जादा भत्ता लागू करा
– परिचारिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा
– सिस्टर इनचार्जची पदे लवकरात-लवकर भरा
महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबब झिंझुर्डे म्हणाले, परिचारिकांच्या मागण्यांबाबत सतत पाठपुरावा सुरु आहे. तसेच, राज्य शासनाच्या अंतर्गत परिचारिकांच्या काही मागण्या आहेत त्याबाबत, महापालिका आयुक्तांशी चर्चा करुन राज्य शासनाला पत्र पाठविले आहे.
“रुग्णसेवा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात रात्रीच्या सुमारास परिचारिकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षाव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे. तसेच, रुग्णालयात नवीन विभाग सुरु करताना नर्सेसची पदे भरण्याची आवश्यकता आहे.
-सविता निगडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड नर्सेस असोसिएशन
रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एका व्हेंटीलेटरवरील रुग्णांच्या देखभालीसाठी एका नर्सेसची आवश्यकता असते. मात्र, सद्यस्थितीत व्हेंटीलेटरवर असणाऱ्या पाच ते सहा रुग्णांच्या देखभालीसाठी एक परिचारिका आहे. अतिदक्षता विभागाप्रमाणेच सर्वसाधारण विभागातही भीषण परिस्थिती जाणवत आहे.
मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांचे पगार रखडतात
मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मानधन तत्वावर सुरक्षारक्षक, परिचारिका, लेखनिक, चालक असे विविध विभागातील कर्मचारी येतात. या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या 18 ते 20 तारखेनंतर होत असल्याने कौटुंबिक उदर्निवाह चालविताना अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे, मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होण्याची आवश्यकता आहे.