कोपरगाव: कामात आपल्यापेक्षा कितीही मोठी अगर छोटी व्यक्ती असली, तरी त्याच्याकडून आपल्याला जे शिकण्यांसारखं आहे, ते शिकून आपण ज्या संस्थेत काम करतो, तिच्या नावलौकीकात भर टाकण्यासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे, असे प्रतिपादन केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या लेखा विभागातील सहायक लेखापाल भानुदास गायकवाड, नानासाहेब राशीनकर, मनोहर पाटील नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी प्रास्तविक करून या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी लक्ष्मण वर्पे, मच्छिंद्र भुसे यांची भाषणे झाली. सत्कारास उत्तर देताना गायकवाड म्हणाले, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आर्थिक शिस्तीला प्राधान्य देत आमच्याकडून काम करून घेतले. राशीनकर, पाटील यांनीही मनोगत व्यक्त कले.
शिंदे पुढे म्हणाले की, कर्मचारी आणि व्यवस्थापन ही संस्थेच्या रथाची दोन चाकं असतात. कर्मचाऱ्यांनी आत्मीयतेने काम करावे व पुढच्या पिढीला शिक्षित करावे. सहायक लेखापाल भाऊसाहेब लहरे यांनी आभार मानले. याप्रसंगी सल्लागार राघवेंद्र, लेखा शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.