कोल्हापूर, हातकणंगलेवर शिवसेनेचा भगवा
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. कोल्हापूरच्या जागेवर भगवा फडकवा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न या निवडणुकीत साकार झालं आहे.
कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव करून शिवसेनेचे संजय मंडलिक हे अडीच लाखापेक्षा अधिक विजयी झाले तर हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि दोन वेळा खासदार राहिलेले राजू शेट्टी यांचा पराभव करत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे जवळपास एक लाख मताधिक्य घेत विजयी झाले. या दोघांच्या विजयामुळे कोल्हापूर जिल्हा वरती भगवा फडकला आहे. कोल्हापुरात मंडलिक विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांची, तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विरुद्ध खासदार राजू शेट्टी यांच्यात लढत झाली. धैर्यशील माने हे पहिल्याच प्रयत्नात शेट्टी यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव केला. मंडलिक यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला.
कोल्हापुरात गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून कोल्हापूरची रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदामात तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलावाशेजारील गोदामात सुरू झाली. सुरुवातीच्या टपाली मतांमध्ये कोल्हापुरातून शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाले . प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यावर पहिल्या फेरीपासूनच संजय मंडलिक यांनी आघाडी घेतली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारासच मंडलिक यांचा विजय निश्चित झाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.
धैर्यशील माने यांनाही पहिल्या फेरीपासूनच लीड मताधिक्य मिळाले. त्यांचे मताधिक्य तुलनेत कमी होते. पहिल्या फेरीत तर ते शेकड्यांत होते; त्यामुळे त्या मतदारसंघात चुरस होणार, असे वातावरण होते; परंतु दुसऱ्या फेरीपासून हे मताधिक्य वाढत गेले व कोणत्याच फेरीत शेट्टी यांना मताधिक्य मिळाले नाही. इचलकरंजी, हातकणंगले व शाहूवाडी या मतदारसंघांनी माने यांना भरघोस मते दिली.
अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने धनंजय महाडिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेनेही पुन्हा एकदा संजय मंडलिकांना संधी दिली. याशिवाय बसपातर्फे दुनदप्पा कुंदप्पा श्रीकांत सर, वंचित आघाडीतर्फे डॉ. अरुणा माळी उभ्या आहेत. याशिवाय आठ अपक्षही आपले नशीब आजमावत होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे एकेकाळी शिवसेना उमेदवाराच्या रूपात पराभूत झालेले धनंजय महाडिक 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा धनंजय महाडिकांवर विश्वास टाकून त्यांना मैदानात उतरवले आहे. परंतु त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.