बारामतीत कमळ कोमजले

बारामतीत कमळ कोमजले खासदार सुळेंकडून कांचन कुल यांना धोबीपछाड

बारामती  – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी तिसऱ्यांदा विजय संपादन केला आहे. विजयाची हॅट्ट्रिक नोंदवताना त्यांनी 1 लाख 54 हजारां पेक्षा अधिक मताधिक्‍य मिळविले आहे. 2014च्या निवडणुकीपेक्षा दुपटीने मताधिक्‍य मिळवल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचा देशात बोलबाला झाला आहे. त्यामुळे भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात विजयोत्सव साजरा करत असला, तरी बारामतीत मात्र भाजपाचे कमळ कोमेजले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कांचन कुल या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात होते. मात्र, निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांपेक्षा अधिक लीड घेत भाजपच्या कंचन कुल यांना धोबीपछाड केले. वास्तविक पाहता निवडणुकीदरम्यान बारामती मतदारसंघात भाजपाने प्रचारात आघाडी घेतली होती. असे असले तरी त्याचे मतात रुपांतर करण्यासाठी भाजप सर्व पातळीवर अपयशी ठरले. 2014 मध्ये सुळे यांना निसटता विजय मिळाला होता. कमळाच्या चिन्हावरचा उमेदवार असता तर कदाचित भाजपचा विजय झाला असता असा कयास त्यावेळी काढण्यात आला होता.

अशा प्रकारची दुरुस्ती करत भाजपाने महादेव जानकर यांना डावलत कांचन कुल यांना कमळाच्या चिन्हावर उभे केले. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून बारामतीची जागा जिंकण्याचा जणूकाही विडाच उचलला होता. त्या पद्धतीने यंत्रणा राबवण्यात आली. कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ देण्यात आले. असे असले तरी सुप्रिया सुळे यांनी मिळविले मताधिक्‍य पाहता भाजपाची बारामती मतदारसंघात सर्व रणनिती फेल ठरली. बारामतीचा पारंपरिक मतदार हा राष्ट्रवादीच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.