पिंपरी – सत्यनारायणाच्या पुजेसाठी आलेल्या व्यक्तीने बळजबरी करत घरात घुसून 53 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार सोमवारी (दि. 13) रात्री साडेनऊच्या सुमारास लांडेवाडी येथे घडला. राजेश कनोजिया (वय 36, रा. लांडेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 53 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या शेजारी सत्यनारायणाची पूजा होती. त्या पूजेसाठी शेजाऱ्यांचे पाहुणे घरी आले होते. पूजा संपल्यानंतर पाहुणे घराबाहेर उभे राहिले असता राजेश याने त्या पाहुण्यांशी हुज्जत घातली. तसेच, राजेश हा फिर्यादी महिलेच्या अंगावर धावून आला. वाद नको म्हणून महिलेने घराचा दरवाजा बंद केला. परंतु राजेशने जबरदस्तीने दरवाजा ढकलून महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला.