अपेक्षित निकालासाठी मागितले 50 हजार
सातारा – ग्राहक न्यायालयातील कोर्टाने पैसे मागितले असून, त्यांच्या मदतीने चालू केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, असे सांगून साताऱ्यात 50 हजार रुपये स्वीकारताना ऍड. शिवराज मारुती पाटील (वय 30, मूळ रा. निगडी ता. कराड) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा येथील पथकाने रंगेहाथ अटक केली. साताऱ्यात न्यायालयाच्या बाहेरच लाच घेणाऱ्या वकिलाला अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे 46 वर्षीय आहेत. तक्रारदार यांची सातारा ग्राहक न्यायालयात एक केस सुरू आहे. संशयित आरोपी ऍड. शिवराज पाटील हे या प्रकरणातील तक्रारदार यांचे खासगी वकील आहेत. ऍड. शिवराज पाटील याने तक्रारदाराला निकाल तुमच्या बाजूने लागायचा असेल तर कोर्टाला सुमारे 1 लाख 70 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा एसीबी विभागात लेखी तक्रार दिली होती.एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर दि. 26 एप्रिल रोजीच्या पडताळणीत वकीलाकडून पैशांची मागणी झाल्याचे समोर आले.
लाचेची रक्कम बुधवार दि. 15 मे रोजी घेण्याचे ठरले होते. यासाठी सातारा एसीबीच्या पथकाने बुधवारी सकाळपासूनच साताऱ्यातील ग्राहक न्यायालयाच्या बाहेर सापळा लावला होता. लाचेची रक्कम ग्राहक न्यायालयाच्या बाहेरच रस्त्याकडेला तक्रारदाराच्या चारचाकी वाहनामध्ये पंचांसमक्ष संशयित वकीलाने लाचेची रक्कम स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच संशयित ऍड.शिवराज पाटील याला एसीबीच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती.
संशयिताला ताब्यात घेवून त्याची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी वकीलाच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि आरीफा मुल्ला, पोलिस हवालदार भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुंखे, संजय अडसुळ, अजित कर्णे, विनोद राजे, प्रशांत ताटे, महिला पोलीस श्रध्दा माने, विशाल खरात, शितल सपकाळ, संभाजी काटकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.