एमपीएफ बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा
पुणे – पुरूष गटात सन सुपर किंग्ज्, बीएमसी फायटर्स या संघांनी तर, महिला गटात बीएसएम पॉवर एन्जल्स् आणि झोरीया एन्जल्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून येथे होत असलेल्या महेश प्रोफेशन फोरम (एमपीएफ) यांच्या तर्फे आयोजित “एमपीएफ बॉक्स क्रिकेट लीग’ स्पर्धेत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
राजयोग लॉन्स्, मार्केटयार्ड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत धीरज मंत्री याच्या 31 धावांच्या जोरावर बीएमसी फायटर्स संघाने केप्र मसालेदार संघाचा 7 गडी राखून सहज पराभव केला. केप्र संघाने केलेल्या 72 धावांचे आव्हान बीएमसी संघाने 5 चेंडू राखून सहज पार केले. यामध्ये धीरज मंत्रीच्या 31 धावा आणि अजय झंवर याच्या 18 धावांमुळे संघाने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कुशल राठीच्या अष्टपैलू खेळीमुळे सन सुपर किंग्ज् संघाने आदित्य बिर्ला सर्जिकल स्ट्राईक संघाचा 51 धावांनी पराभव केला. सन सुपर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी गमावून 118 धावा केल्या. यामध्ये संदीप काब्रा याने 43 धावा आणि कुशल राठी याने 22 धावा करून संघाला मोठी धावसंख्या रचून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
महिला गटाच्या सामन्यात श्रध्दा सारडाच्या अष्टपैलू खेळीमुळे झोरीया एन्जल्स् संघाने सुरोज डायनामिक्स् क्विन्स् संघाचा 65 धावांनी सहज पराभव करून अंतिम फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले. या विजयामध्ये पायल बियानी (26) व श्रध्दा सारडा (26 धावा) यांची खेळी महत्वपूर्ण ठरली. श्रध्दा राठीच्या खेळीच्या जोरावर पर्व डायमंडस् संघाने बीएसएम पॉवर एन्जल्स् संघाचा 5 धावांनी सनसनाटी पराभव करून अंतिम फेरी गाठली.