सातारा – मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीसाठी लोकांमध्ये चांगला उत्साह आहे. तसेच भावही स्थिर राहिल्याने साताऱ्याचा सराफ कट्टा मंगळवारी गजबजला. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी वाढल्याने सराफ व्यावसायिकांचा उत्साह दुणावला.
मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचे असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. यादिवशी प्रामुख्याने सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे काही दिवस आधीपासून लोक सोने खरेदीसाठी बुकींग करून ठेवतात. मागील काही वर्षात त्यामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहेत. त्यासाठी सराफी व्यावसायिकांकडूनही सुवर्ण भिशी सारख्या आकर्षक ऑफर आणल्या जातात. यंदा सराफी बाजारात अक्षय्य तृतीयेचा उत्साह वाढला असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल अधिक होण्याची शक्यता आहे. सुमारे दोन वर्षे बाजारात काही प्रमाणात मंदीची स्थिती होती. त्यामुळे खरेदी मंदावली होती. यंदा मात्र खरेदीत होत असून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यावर कळस चढला असे व्यावसायिकांनी सांगितले. साताऱ्यात सराफी कट्ट्यांवर नाजूक कलाकुसरीच्या दागिन्याप्रमाणे मध्यमवर्गीयांना आकर्षित करणाऱ्या वेढणे खरेदीच्या योजना ठेवण्यात आल्या होत्या. वेढणे खरेदीत झळ व मजुरी दोन्ही अगदी नगण्य असल्याने व माफक दरामुळे त्या खरेदीला पसंती दिली गेली. दागिन्याच्या या प्रकारात सव्वा ते दीड कोटीची उलाढाल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सराफी व्यावसायिक घोडके म्हणाले, सोने खरेदीसाठी मागील पंधरा दिवसांपासून बुकींग सुरू आहे. विविध आकर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत. गुढीपाडव्यादिवशी प्रामुख्याने महाराष्ट्रातील नागरिकच सोने खरेदी करतात. पण अक्षय्यतृतियेला महाराष्ट्रासह विविध राज्यातील लोकांकडून सोने खरेदी केली जाते. यावर्षी निवडणुकीच धामधुम संपली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरेदीत उत्साहही दिसून येत आहे. सोने दर 32 हजार 300 च्या जवळपास आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीपेक्षा यामध्ये चांगली वाढ होईल.
रिअल इस्टेटचे गाडे सुध्दा पूर्वपदावर येऊ लागल्याने बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. कमीत कमी अडीच ते तीन हजार स्कवेअर फूट प्रमाणे वन बीएचकेच्या प्रिमिअमला होमला पसंती दिली जात आहे. साताऱ्यात गेल्या दोन दिवसात एकूण छोटेमोठे अकरा गृहप्रकल्प लॉंच झाले. एकूण आर्थिक उलाढालीचा टप्पा सहा कोटीच्या पुढे निघाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी टू बीएचके ऐवजी छोट्या फ्लॅटच्या बांधकामांना पसंती दिली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर साताऱ्यात सहाशे पेट्यांची कर्नाटकी हापूसची आयात झाली. देवगड हापूस सुध्दा चांगलाच चर्चेत असून आठशे ते हजार रुपये डझनाने ते उपलब्ध असल्याने सातारकरांनी आंबे खरेदीसाठी गर्दी केली होती.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 10 ते 15 टक्के जास्त उलाढाल अपेक्षित आहे. सोन्याचे भाव स्थिर आहेत. नोकरदार वर्गाचे पगार झालेले असून लग्नसराईचे मुहूर्त आहेत. तसेच नागरिकांचा गुंतवणुकीकडेही कल वाढला आहे. मागील दोन वर्ष बाजारात काही प्रमाणात मंदी होती. ही स्थिती आता राहिली नसल्याने अक्षय तृतियेला मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी झाली. प्रामुख्याने दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
किशोर घोडके , सराफी व्यावसायिक