पुराडा पोलीस ठाण्यात 18 जणांविरोधात गुन्हे दाखल
गडचिरोली – गडचिरोलीमधील कुरखेडा येथे महाराष्ट्र दिनी ( 1 मे) झालेल्या भ्याड माओवादी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर आता या प्रकरणातही मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. त्यानंतर शनिवारी ( 4 मे) माओवाद्यांविरोधात पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता माओवाद्याच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांचा समावेश देखील करण्यात आला आहे.
जांभूरखेडा येथे सी-60 कमांडो जवानांचे वाहन जात असताना माओवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात एक चालक आणि 15 जवान शहीद झाले आहेत. या स्फोटात कमांडोंच्या गाडीचे अक्षरश: तुकडेतुकडे झाले. दरम्यान, माओवाद्यांनी केलेला हा हल्ला मागील वर्षीच्या माओवादविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी करण्यात आला, असे बोलले जात आहे.
दरम्यान, गतवर्षी गडचिरोलीमध्येच माओवादविरोधी कारवाईमध्ये 16 माओवादी मारले गेले होते. ही कारवाई 22 एप्रिल 2018 ला एटापल्लीमध्ये माओवादविरोधी पथकाने तीव्र केली होती. बोरियाच्या जंगलात माओवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या चकमकीत हे माओवादी ठार झाले होते.