आपल्यावरील हल्ला प्रकरणात केजरीवालांनी भाजपला ठरवले दोषी

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काल हल्ला झाला होता. या प्रकरणी केजरीवालांनी भाजपला दोषी ठरवले आहे. त्यांनी म्हटले आहे की गेल्या पाच वर्षात आपल्यावर अशा प्रकारचे नऊ हल्ले झाले. आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न करून आम आदमी पक्ष संपवण्याचा कट करण्यात आला आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणेत जाणिवपुर्वक त्रुटी केंद्र सरकारने ठेवल्या होत्या. त्यामुळेच अशा प्रकारचा हल्ला होऊ शकला म्हणून या हल्ल्याला भाजपच जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान केजरीवालांवर हल्ला करणारा इसम हा आम आदमी पक्षाचाच नाराज कार्यकर्ता आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.

आज पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की दिल्लीचे पोलिस केंद्र सरकारच्या नियंत्रणा खाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा ही भाजपच्याच हातात आहे. आपल्याला सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्यानेच आपल्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला आहे. पोलिसांकडून झालेली ही सुरक्षा व्यवस्थेतील चूक होती की ती जाणिवपुर्वक केली गेली होती याचा खुलासा भाजपने केला पाहिजे. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात आपल्यावर भाजपने कशा प्रकारे कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला त्याचा तपशीलही केजरीवालांनी या पत्रकार परिषदेत सांगितला. ते म्हणाले की मुख्यमंत्री असतानाही आपल्यावर सीबीआयचे छापे घालण्यात आले. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरही सीबीआयचे छापे घालण्यात आले. आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना या काळात अटक करण्यात आली. घटनाबाह्यरित्या त्यांनी आमचे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.