निवडणूक आयोगाने बजावली आणखी एक नोटीस
भोपाळ – मध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने साध्वी यांच्यावर तीन दिवसांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली होती. ही कारवाई रविवारी संपताच साध्वी यांना निवडणूक आयोगाने पुन्हा एक नोटीस बजावली आहे.
प्रचारबंदीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मंदिरात जाऊन भजन आणि किर्तनाच्या माध्यमातून प्रचार केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. याची तक्रार कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. या प्रकरणावर कारवाई करताना निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पुन्हा नोटीस पाठविली आहे. यावर दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास निवडणुक आयोगाने साध्वी यांना सांगितले आहे. त्याचप्रमाणे मंदिरातील व्हिडीओ आणि फोटो जमा करण्यास सांगितले आहे.
बाबरी-मशीद विध्वंसाबाबत साध्वींनी आनंद व्यक्त केला होता. तसेच या कृत्याचा आपल्याला गर्व असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वादग्रस्त विधानामुळे निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. त्यामुळे याबाबत कारवाई म्हणून त्यांच्यावर 72 तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली. ही बंदी गुरुवार सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहे. या काळात त्या कोणत्याही प्रचार रॅलीत, सभेत सहभागी होऊ शकणार नाहीत. तसेच कोणतीही मुलाखत तसेच प्रतिक्रियाही त्यांना देता येणार नव्हत्या. मात्र, या काळात साध्वी यांनी मंदिरात जाऊन भजव किर्तन करत प्रचार केला. असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने केली होती. बाबरीच्या विधानापूर्वी त्यांनी 26/11च्या मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी या वक्तव्याबाबत माघार घेत खेद व्यक्त केला होता.