बंगालमधील भाजपच्या 10 उमेदवारांनाही सुरक्षाकवच
नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे पुत्र शौर्य यांना केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शौर्य यांना झेड दर्जाची सुरक्षा उपलब्ध होईल.
अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून आधीपासूनच झेड प्लस दर्जाची सर्वोच्च सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आता 43 वर्षीय शौर्य यांच्याही सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) एके-47 रायफलधारी 15 ते 16 कमांडो तैनात असतील. वडिलांशी शत्रुत्वाची भावना बाळगणाऱ्यांपासून शौर्य यांना असलेला संभाव्य धोका ध्यानात घेऊन त्यांना व्हीआयपी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या पश्चिम बंगालमधील भाजपच्या 10 उमेदवारांनाही मर्यादित कालावधीसाठी सुरक्षा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यांना एक्स, वाय आणि वाय प्लस दर्जाचे सुरक्षाकवच उपलब्ध होणार आहे. त्या उमेदवारांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री एस.एस.अहलुवालिया यांचाही समावेश आहे.