जेरुसलेम – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांची भेट घेतली आणि गाझामधील युद्धाबाबत चर्चा केली. यावेळी प्रादेशिक घडामोडी आणि गाझामध्ये तात्काळ मानवतावादी मदत पोचवण्याच्या गरजेवरही डोवाल आणि नेतान्याहू यांच्यात चर्चा झाली. डोवाल यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत नेतान्याहू यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे.
हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबाबतही डोवाल आणि नेतान्याहू यांच्यात चर्चा झाली. हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने सुरू केलेल्या लष्करी कारवाईमध्ये आतापर्यंत ३० हजार पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. युद्धाच्या परिस्थितीमुळे गाझामध्ये मदत पोचवण्यासाठी मोठी अडचण येत असून यासंदर्भातही डोवाल आणि नेतान्याहू यांच्यात चर्चा झाली.
गाझाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश म्हणजे अंदाजे ५ लाख ७५ हजार लोकांपुढे उपासमारीचे संकट असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. डोवाल यांनी इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाकी हनेग्बी यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा केली.
गाझातील युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया, इजिप्त आणि जॉर्डनसारख्या प्रदेशातील अन्य महत्वांच्या नेत्यांच्या नियमित संपर्कात आहेत. गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांसाठी भारताने मानवतावादी भूमिकेतून मदत साहित्य पाठवले आहे.