लोकप्रिय पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदींचा आवाज सगळ्यांनाच परिचित आहे. पंजाबी पॉप गाण्यांबरोबर सूफी आणि लोकगीतेही दलेर मेहंदीच्या आवाजात लोकप्रिय झाली आहेत. दलेर मेहंदीच्या या आवाजाचा उपयोग आता गाण्यासाठी नव्हे तर एका कॉमिक कॅरेक्टरच्या कार्टून शो साठी करून घेतला जाणार आहे. बालचमूंमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या छोटा भीमच्या सिरीजमधील “छोटा भीम कुंगफू धमाका’साठी दलेर मेहंदी डबिंग करणार आहे. अर्थात दलेर मेहंदीच्या आवाजातले एक गाणे या कार्टून शो मध्ये असणार आहे.
दलेर मेहंदीच्या मुलीच्या आवाजातले एक गाणे देखील या गाण्याच्या व्हिडीओमध्ये दिसणार आहे. छोटा भीम नेहमीच आपल्या मित्रांच्या मदतीला धावून जातो आणि दुष्टांबरोबर फायटिंग करतो. त्याच्या या पराक्रमाचे वर्णन त्याचे मित्र या गाण्यामधून करताना दिसणार आहेत. या गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच झाले आणि त्या गाण्याचा म्युजिक व्हिडीओ करण्याची योजनादेखील आहे. छोटा भीमची ही नवीन सिरीज 10 मे पासून रिलीज होणार आहे.