मावळ -लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील 225 गुन्हेगारांवर प्रतिबंधक, तर या पैकी 73 जणांवर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 48 गावांचा समावेश असून, यामध्ये वडगाव शहर, कान्हे, टाकवे, जांभूळ, सात या प्रमुख गावांसह आंदर मावळ भागातील सर्व गावांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपायायोजना व प्रतिबंधक कारवाईवर भरण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 73 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
यामध्ये स्थानबद्ध व महाराष्ट्र पोलीस कायदा 55, 56 व 57 अंतर्गत 13 जणांवर व गेल्या पाच वर्षांमध्ये घडलेल्या गुन्ह्यातील एकूण 60 गुन्हेगारांवर निवडणूक काळापुरती तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय 142 जणांवर चॅप्टर केस करण्यात आली आहे, अशी एकूण 215 जणांवर आचारसंहिता जाहीर झाल्यापासून कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच हत्यार बाळगल्याप्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे.