पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “मी फक्त बारामती बारामती करत बसणार नाही. तुमची साथ, मदत मला केवळ बारामतीपुरतीच नव्हे तर पुणे, मावळ आणि शिरूरमध्येही पाहिजे. या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवारांना लोकसभेत पाठवण्यासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वस्ताद आणि कुस्तीगिरांना केले.
कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातील नामांकित वस्ताद व कुस्तीगीर यासह क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांचा स्नेहमेळावा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. एवढेच नव्हे तर कुस्तीत सुरू असलेले मतभेद बाजूला ठेवून आणि खेळामध्ये कोणतेही राजकारण न आणता एकदिलाने सर्वांनी काम करावे. कोणाच्याही भावनिक शब्दांना बळी पडू नका, असे आवाहनही पवार यांनी कुस्तीगिरांना केले.
राज्यासह देशात क्रीडाक्षेत्रातील विविध सहकाऱ्यांना नेतृत्वाची संधी दिली जाते. आज पुण्यातून तुमचाच पैलवान लोकसभेत जाऊ शकतो. त्यासाठी पुणे शहरातील सहा आमदार कामाला लागले, त्याप्रमाणे सर्व कुस्तीगिरांनी आणि क्रीडाप्रेमींना सहकार्य करावे. शिरूर आणि बारामतीमध्ये घड्याळ, मावळमध्ये धनुष्यबाण तर पुणे शहरात कमळाला मतदान करून महायुतीला लोकसभेत संधी द्यावी, असे पवार म्हणाले.
यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, आप्पा रेणुसे, बाबा कंधारे, बाबुराव चांदेरे, पंकज हरपुडे, कुमार बराटे, मंगलदास बांदल, हिंदकेसरी अमोल बराटे, योगेश दोडके, शिवराज राक्षे, बाळासाहेब लांडगे, शांताराम जाधव यासह नामांकित पैलवान उपस्थित होते.
क्रीडापटू, कुस्तीगिरांसाठी राज्य शासन तत्पर
कोल्हापूरमध्ये अनेक पैलवान निर्माण होतात. त्यासाठी कोल्हापूरच्या तालमीसाठी भविष्यात विकास आराखडा तयार करण्यात येईल. तसेच क्रीडा क्षेत्रामधील मिळणाऱ्या पदकामध्ये राज्य सरकारने जवळपास दहापट वाढ केलेली आहे. त्यामुळे हे सरकार क्रीडा क्षेत्रामधील खेळाडूंसाठी व कुस्तगीरांसाठी चांगले काम करत आहे. क्रीडाक्षेत्राला राज्य सरकारची नेहमीच भक्कम साथ असेल, असा विश्वास अजित पवार यांनी दिला.