ICC World Test Championship Point Table : इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना टीम इंडियानं. जिंकला. रविवारी राजकोट येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला. या मोठ्या विजयासह टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या पॉइंट टेबलमध्येही मोठा फायदा झाला आहे. आता टीम इंडिया डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
इंग्लंडविरुद्धची तिसरी कसोटी जिंकल्यानंतर भारताचे सात सामन्यांतून 50 गुण झाले आहेत. भारताची गुणांची टक्केवारी 59.52 वर पोहोचली आहे. भारताने ऑस्ट्रेलियन संघाला मागे टाकले. भारत आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने सात कसोटी सामने खेळले असून चार जिंकले आहेत. टीम इंडियाने दोन सामने गमावले आहेत. एक कसोटी अनिर्णित राहिली आहे.
ऑस्ट्रेलियाची गुणांची टक्केवारी 55 असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. 2023-25 च्या मोसमात ऑस्ट्रेलियाने 10 कसोटी सामने खेळले आहेत आणि सहा जिंकले आहेत. कांगारूंना तीनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
दक्षिण आफ्रिकेवरील दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर न्यूझीलंड संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी 75.00 आहे. त्यानी आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले असून तीन सामने जिंकले आहेत. एकात संघाचा पराभव झाला आहे.
तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. गुणतालिकेत त्याचा संघ 8व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी फक्त 21.88 टक्के आहे. राजकोट कसोटीतही स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंडला WTC गुणांचे मोठे नुकसान झाले. त्यांना 19 गुणांचे नुकसान सहन करावे लागले.
दरम्यान, यावेळी टीम इंडियाने आपल्या WTC प्रवासाची सुरुवात वेस्ट इंडिज दौऱ्याने केली. टीम इंडियाने त्या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने विजय मिळवला होता. यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्याचबरोबर सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.