Shiv Jayanti 2024 – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यातील ढोल-ताशांचे दिमाखदार सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फुर्त घोषणांमुळे आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा परिसर दुमदुमला.
शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भव्य महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला. यानंतर पालखी पूजन करण्यात आले. | Shiv Jayanti 2024
महाराष्ट्र सदनाच्या केंद्रस्थानी स्थापित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला छत्रपती परिवारातील सदस्य, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांसह वरिष्ठ अधिका-यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग, अप्पर निवासी आयुक्ती निवा जैन, सहाय्यक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. | Shiv Jayanti 2024
ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण
ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले होते आणि सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातारवण निणादून गेले होते. शिवराय ढोल पथक, नाशिक येथील 30 वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांना ठेका धरायला लावला.