NCP MLA Disqualification – शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेत अजित पवार सत्ताधारी बाकांवर बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. दोन्ही बाजूंकडून आपलाच गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करण्यात येत होता. निवडणूक आयोगाने आज याबाबत कौल देताना अजित पवार यांच्या पारड्यात वजन टाकले. निवडणूक आयोगाच्या निकाल लागल्याने आता आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकताच शिवसेना पक्षातील आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला. एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांच्या समर्थक आमदारांना त्यांनी पात्र ठरवलं. मात्र शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा असून भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती योग्य ठरवत त्यांनी शिंदेसेनेला मोठा दिलासा दिला.
शिवसेनेबाबतचा निर्णय दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काय होणार याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. निवडणूक आयोगाचा निकाल लागला असल्याने विधानसभा अध्यक्षांना पुढील निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
१५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ | NCP MLA Disqualification
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ ची मुदत दिली होती.
मात्र विधानसभा अध्यक्षांनी मुदतवाढ मागितल्याने त्यांना १५ फेब्रुवारी २०२४पर्यंत वेळ देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. अशातच निवडणूक आयोगाचा निकाल आज जाहीर झाल्याने लवकरच विधानसभा अध्यक्षही याबाबतचा निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय | NCP MLA Disqualification
निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह दोन्हीही अजित पवार गटाच्या पदरात टाकण्याचा निर्णय दिला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाबाबतही असाच निर्णय दिला होता.
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात पक्ष व चिन्हांवरून वाद सुरु असताना, निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षातील बहुमत लक्षात घेत एकनाथ शिंदे यांना पक्ष व निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
‘दादा’चं साहेब! निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी अन् घड्याळाबाबत मोठा निर्णय…