Varun Kumar: क्रीडा विश्वातून धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. हाॅकी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर बलात्कार केल्याचा आरोप करण्याता आला असून तो खेळाडू आता फरार आहे. या बातमीने खळबळ उडाली आहे. भारतीय हॉकी संघाचा बचावपटू वरुण कुमारवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे. पीडितेने त्याच्याविरुद्ध ज्ञानभारती पोलिस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. वरुणवर लग्नाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
संबंधित तरूणीने सांगितले की, 2019 मध्ये जेव्हा ती वरुणला भेटली तेव्हा ती 17 वर्षांची होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती हॉकीपटूला भेटली. त्यावेळी वरुण भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) प्रशिक्षण घेत होता. वरूण कुमार याने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवत अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या जालंधर येथील निवासस्थानावर छापा टाकला. वास्तविक, वरुण मूळचा हिमाचल प्रदेशचा आहे, पण तो जालंधरमध्ये राहतो. आता वरुण कुमार हा फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे आता खेळाडूचं करिअर उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता आहे.
वरुण फरार….
याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे, ‘वरूण पळून जात आहे. त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांना दिलेल्या जबानीत पीडितेने सांगितले की, भारतीय खेळाडू जेव्हा जेव्हा बंगळुरूला यायचा तेव्हा तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. आता पीडिता 22 वर्षांची आहे, पण दोघांची पहिली भेट ती 17 वर्षांची असताना झाली होती. पीडितेने आरोप केला आहे की वरुण कुमारने ती केवळ 17 वर्षांची असताना तिचा शारीरिक छळ केला. पीडितेने वरुण कुमारवर लग्नाच्या बहाण्याने आमिष दाखवल्याचा आरोप केला आहे. वरुण कुमार गेल्या 5 वर्षांपासून तिचा छळ करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
2017 मध्ये भारतासाठी पदार्पण…
हिमाचलचा रहिवासी असलेला वरुण काही वर्षांपूर्वी हॉकीसाठी पंजाबमध्ये आला होता. त्याने 2017 मध्ये भारतासाठी पदार्पण केले. 2022 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्याने रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय 2022 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा तो एक भाग होता. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कांस्यपदक विजेत्या संघाचाही तो भाग होता.
दोन दिवसांपूर्वीच झाला होता डीएसपी…
दोनच दिवसापूर्वी वरूणला डीएसपी बनवण्यात आले होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी वरुणला नियुक्ती पत्र दिले होते. वरुण कुमारला 2018 मध्ये अर्जुन पुरस्कारही देण्यात आला होता.
वडीलांनी या प्रकरणाची माहिती नाकारली….
वरुणवरील आरोपांबाबत बोलताना त्याचे वडील ब्रह्मानंद यांनी या प्रकरणाची माहिती नाकारली. त्यांनी सांगितले की, त्यांचे त्यांच्या मुलाशी बोलण झालेलं नाही, त्यांचा फोन बंद आहे. त्याचे वडीलांनी सांगितले की, “काय प्रकरण आहे ते मला माहीत नाही. वरुणचा फोन बंद आहे. त्याच्याशी बोलल्यानंतरच मी काय प्रकरण आहे ते सांगू शकेन. वरुण सध्या ओडिशामध्ये भारतीय हॉकी संघाच्या शिबिरात आहे. त्याच्याशी बोलल्यानंतर हे प्रकरण काय आहे ते स्पष्ट होईल .”