IND vs ENG Test Series 2024 : अफगाणिस्तानविरुद्धची मालिका संपल्यावर भारतीय संघ मायदेशातच इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, या मालिकेबद्दल बीसीसीआयने यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुलबाबत काही संकेत दिले आहेत. या मालिकेत राहुल केवळ स्पेशालिस्ट फलंदाज म्हणूनच खेळेल असे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले आहे.
भारतात कसोटी सामन्यात यष्टीरक्षण करणे सोपे नसते. परदेशात यष्टीरक्षक फलंदाजाला केवळ वेगवान गोलंदाजांच्याच गोलंदाजवर यष्टीरक्षण करावे लागते. मात्र, भारतात फिरकी गोलंदाज जास्त षटके गोलंदाजी करतात व त्यामुळे यष्टीरक्षण व फलंदाजी अशी दुहेरी भूमिका करणे प्रत्येकवेळी शक्य होत नाही. त्यातून दुखापतींचाही धोका असतो. आता राहुलकडे बीसीसीआय केवळ फलंदाज म्हणूनच पाहात आहे. त्यामुळे या मालिकेत तरी त्याच्याकडून यष्टीरक्षणाची अपेक्षा केली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
भारतातील खेळपट्ट्या फिरकीला साथ देत असल्याने यष्टीरक्षकाचे काम जास्त कठीण व प्रदीर्घ होत असते. जर इंग्लंडसारख्या भक्कम संघाला पराभूत करत ही मालिका जिंकायची असेल तर स्पेशालिस्ट यष्टीरक्षकच संघात असणे योग्य आहे व त्यामुळेच राहुलची या दुहेरी कामगिरीतून सुटका करण्यात आली आहे.