IND vs ENG Test Series : 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली भारतीय संघाचा भाग असणार नाही. कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे, याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (22 जानेवारी) दिली.
कोहलीच्या बदलीची घोषणा लवकरच केली जाईल, असेही बीसीसीआयने म्हटले आहे. त्यामुळे आता कोहलीची जागा कोण घेणार, हा प्रश्न आहे. जाणून घेऊया कोणत्या दोन नावांची चर्चा सुरू आहे.
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेनुसार, पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदार किंवा सरफराज खान या दोघांपैकी एकाचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. पाटीदार हा रॉयल चॅलेंजर बंगलोरचा भाग आहे आणि तो आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत खेळतो. रजत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो.
सरफराज खान हा देशांतर्गत क्रिकेटचा स्टार आहे आणि तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे, त्यामुळे काही काळापासून त्याला भारतीय कसोटी संघाचा भाग बनवण्याची मागणी होत आहे. सर्फराज मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. अशा स्थितीत सरफराजसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.
सरफराज आणि रजतची फर्स्ट क्लास कारकीर्द…
सरफराज खान : मुंबईकडून खेळणाऱ्या या स्टार फलंदाजाने आतापर्यंत 44 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 65 डावांमध्ये 68.20 च्या सरासरीने 3751 धावा केल्या आहेत. या कालावधीत, 26 वर्षीय सफाराझने 13 शतके आणि 11 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 301* धावा होती.
रजत पाटीदार : तीस वर्षीय रजत पाटीदार, जो मध्य प्रदेशकडून खेळतो, त्याने आतापर्यंत 55 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, त्यापैकी 93 सामन्यांमध्ये त्याने 45.97 च्या सरासरीने 4000 धावा केल्या आहेत. दरम्यान, पाटीदारने 12 शतके आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 196 धावा होती.