टोरांटो, (कॅनडा) – पाकिस्तानच्या लष्कराकडून करण्यात येणार् या अत्याचारांविरोधात कॅनडामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानमधील अत्याचार, अपहरण, न्यायबाह्य हत्या, लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून होणार्या अत्याचाराविरुद्ध हजारो बलुच नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी कॅनडातील बलुच, सिंधी आणि पश्तून रहिवाशांनी शनिवारी ही निदर्शने केली. ही निदर्शने बलुच ह्युमन राईटस कौन्सिल ऍन्ड पश्तुन कौन्सिल, कॅनडाने आयोजित केली होती.
बलुच, पश्तुन आणि सिंधी समाजावर लष्कराकडून होत असलेल्या अत्याचारांबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा यावेळी निषेध करण्यात आला. या निदर्शनांमध्ये हजारो बलुच, पश्तुन आणि सिंधी नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये महिला आणि मुलांचीही संख्या लक्षणीय होती.
नौव्हेंबर महिन्यात २२ वर्षीय बलुच युवकाला बेकायदेशीरपणे अटक करून कोठडीत डांबण्यात आले होते. या युवकाचा कोठडीतच मृत्यू झाला होता. बलुचिस्तानमधील या अत्याचाराविरोधात डॉ. माहरंग बलोच यांनी आवाज उठवला होता. गेल्या महिन्यात बलुचिस्तान ते इस्लामाबादपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये डॉ. बलोच सहभागी झाले होते. हा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि डॉ. बलोच यांच्यासह शेकडो बलोच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.
बलुच, सिंधी आणि पश्तुन कार्यकर्त्यांना पाकिस्तानच्या काऊंटर टेरेरिझम डिपार्टमेंटकडून बेकायदेशीरपणे अटक करून त्यांची हत्या केली जात असल्याचा आरोप मानवी हक्कविषयक संघटनांनी केला आहे. पाकिस्तानमधील आतापर्यंतच्या पंतप्रधानांकडून बलुचिस्तानवासियांना दुजाभाव दिला जात असल्याचा निषेध देखील कॅनडामध्ये आयोजित निदर्शनांदरम्यान करण्यात आला.