पुणे – ड्रग तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी कोर्ट कंपनीच्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि सहायक फौजदार जनार्दन काळे यांना पोलीस दलातून बडतर्फ (शासकीय सेवेतून बडतर्फ) करण्यात आले आहे.
ललित पाटील पळून गेल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी १० मोहिनी डोंगरे आणि जनार्दन काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यापूर्वी कोर्ट कंपनीचे पोलीस नाईक नाथाराम भारत काळे आणि पोलीस शिपाई अमित सुरेश जाधव या दोघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तसेच गंभीर स्वरूपाचे शिस्तभंग आणि बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवून दोघांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात यापूर्वी दहा जणांना निलंबित देखील करण्यात आलेले आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्यामुळे डोंगरे आणि काळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.