नवी दिल्ली – ते म्हणतात ना, “हातोंकी लकिरोंसे कुछ नही होता, हौसलोंसे उडाण होती है!”, अगदी तशाच प्रकारे पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकून भारतीय तिरंदाज शीतल देवी हिने इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली प्रतिभा दाखविल्यानंतर आगामी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आपल्या पायाच्या मदतीने अचूक निशाणा लावून देशासाठी अव्वल स्थान मिळविण्याचे लक्ष्य आता शीतलने ठेवले आहे.
पायांनी बाण मारून पदक जिंकणारी शीतल जगातील पहिली महिला ठरली होती यासह मंगळवारी जाहीर झालेल्या पॅरा वर्ल्ड तिरंदाजी क्रमवारीतील महिला कंपाऊंड खुल्या गटात तिने अव्वल क्रमवारी गाठत इतिहास रचला आहे. जम्मूच्या किश्तवाडा येथील १६ वर्षीय खेळाडू असणारी शीतल ‘बीइंग यू’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ लाँच प्रसंगी बोलत होती. विशेष म्हणजे, तिला भारतीय लष्कराने लहानपणी दत्तक घेतले होते. जुलैमध्ये तिने सिंगापूरच्या अलीम नूर एस हिला १४४-१४२ ने पराभूत करून पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून तिच्या सुवर्णकारकिर्तीला सुरुवात केली.
Asian Para Games 2023 : तिरंदाजीत मिश्र सांघिक गटात ‘राकेश-शीतल’ची सुवर्ण कामगिरी…
शीतलवर अमेरिकन हात नसलेला तिरंदाज मॅट स्टुटझमनचा खूप प्रभाव आहे. लंडन पॅरालिम्पिक (२०१२) मध्ये पदक जिंकून स्टुटझमनने जगभरात लक्ष वेधले होते.शीतल यावेळी बोलताना म्हणते, ‘मी जेव्हा तिरंदाजी सुरू केली तेव्हा कोणीतरी मला स्टुटझमनचा व्हिडिओ दाखवला. नंतर मला त्याला भेटण्याची संधी मिळाली. त्याला भेटून मला खूप आनंद झाला, असेही तिने यावेळी म्हटले.
Asian Para Games 2023 : दोन्ही हात नसतानाही केली कमाल; भारताच्या शीतलचे तिरंदाजीत सुवर्णयश…
शीतलला ‘फॉकमेलिया’ हा जन्मजात आजार आहे. या आजारात शरिराचे अवयव पूर्णपणे विकसित होऊ शकत नाहीत. परंतू हात नसतानाही तिची हिंमत कधीच कमी झाली नाही. शीतल म्हणाली, ‘मला एक कृत्रिम हात बसवण्यात आला होता पण तो खूप जड होता. त्यामुळे जेव्हा मी तिरंदाजीला सुरुवात केली, तेव्हा ठरवले की मी यापुढे कृत्रिम हात वापरणार नाही. सध्या मी पॅरिसच्या तयारीसाठी सकाळी ७.३० वाजता फिल्डवर पोचून दररोज सुमारे ३०० बाणांसह तिरंदाजीचा सराव करते त्यानंतर संध्याकाळी पाच नंतर मी माझा अभ्यास करते, असे सध्या अकरावीत शिकत असलेल्या शीतलने पुढे सांगितले.
शीतलला तिरंदाजीची निवड करणे खूप अवघड होते. पाय वापरणारी ती एकमेव महिला धनुर्धारी आहे. आम्ही तिला सामान्य खेळाडूंसोबत सराव करायला लावतो जेणेकरून तिचा आत्मविश्वास वाढेल.
– अभिलाषा, शीतल देवीचे प्रशिक्षक
अपयशाला घाबरू नका
शीतलने आशियाई पॅरा गेम्समध्ये महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदकांसह कंपाऊंड मिश्र प्रकारात सुवर्ण आणि महिला दुहेरीत रौप्यपदक पटकावले होते. अपंगांनी नैराश्य सोडून खेळात हात आजमावा, असे आवाहन ती करते. ‘माझ्यासारख्या लोकांनी पराभव स्वीकारू नये. हे यश जरी मिळाले नाही तरी हिम्मत हारू नका. एक-दोनदा हरल्यानंतर खेळ सोडून देणारे लोक मी पाहिले आहेत. मी अशा लोकांना सांगेन की, जय-पराजय हा प्रत्येक खेळाचा भाग असतो, परंतू सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते,’ असेही ती पुढे म्हणाली.