Sunny Deol – मोठे लोक जनतेच्या कल्याणासाठी काही करणार नाहीत, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी शनिवारी बॉलीवूड अभिनेते सनी देओल ( Sunny Deol ) यांच्यावर निशाणा साधला. अर्थात, देओल हे भाजपचे खासदार असल्याने केजरीवाल यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
देओल हे पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्या मतदारसंघासाठी पंजाबमधील आप सरकारने कोट्यवधी रूपयांच्या विकास प्रकल्पांची घोषणा केली.
संबंधित प्रकल्पांच्या कामांचे उद्घाटन केजरीवाल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी देओल यांना लक्ष्य केले. मागील वेळी मतदारांनी मोठे अभिनेते असल्याने देओल यांना विजयी केले.
मात्र, ते मतदारसंघात आले का? जनतेने त्यांचा चेहरा पाहिला का? ते कधीही आले नाहीत. त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला. मोठे लोक काही करणार नाहीत. त्यांच्याऐवजी आम आदमीला मत द्या.
तो जनतेसाठी काहीतरी करेल, असा शाब्दिक टोला केजरीवाल यांनी लगावला. आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील सर्व १३ जागा आप जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी आप सज्ज होत असल्याचे सूचित झाले.