Rupali bhosle : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) ‘संजना’ या भूमिकेमुळे घराघरात पोहचली. याआधी तिने मराठी बिग बॉसमध्ये देखील सहभाग घेतला होता. सध्या ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या कामासह तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी देखील चाहत्यांसोबत शेअर करते. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान रूपालीची अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांच्यासोबत भेट झाली होती. या भेटीनंतरच्या तिच्या भावना तिने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत.
या कार्यक्रमादरम्यान हेमा मालिनी यांनी रुपालीचं भरभरून कौतुक देखील केले. रुपाली भोसले पोस्टमध्ये लिहिते, “ड्रीमगर्ल…त्यांचं सौंदर्य व सुंदर स्वभाव पाहून मी खरंच नि:शब्द झाले. त्यांना रंगभूमीवर लाइव्ह सादरीकरण करताना पाहणं…यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता? खूपचं भारी वाटलं. ज्यावेळी त्यांची आणि माझी भेट झाली. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘तू खूप सुंदर आहेस आणि तेवढंच सुंदर तू नृत्य केलं.’
View this post on Instagram
प्रत्यक्ष त्यांच्याकडून माझं कौतुक ऐकलं हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे. तुम्ही माझं कौतुक केलंत, मला वेळ दिलात याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे हेमा मॅम! तुम्हाला खूप प्रेम.” सोबतच तिने हेमा मालिनी यांच्यासोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.
रुपालीच्या पोस्टनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, मालिकेत सतत वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणारी संजना म्हणजेच रूपाली या पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा पारंपरिक लूकमधील तिचे फोटो शेअर करताना दिसते.