Mallikarjun Kharge : 2024 च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्या तरी, इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यावर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही. आपल्या नेत्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनविण्याची स्पर्धा आघाडीतील सदस्य पक्षांमध्ये रंगल्याचं दिसत आहे. इंडिया अलायन्स लोकसभा निवडणूक-2024 नितीश कुमार किंवा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवू शकते अशी चर्चा होती. पण आता फासे पालटताना दिसत आहेत.
नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून किती पसंती मिळेल अशी शंका व्यक्त केली जात असतानाच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारत आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असू शकतात, असे संकेत दिले आहेत.
सोनिया गांधींसह प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना मोठी भूमिका देण्याचे संकेत दिले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी सोनिया गांधी यांनी अधिकृतपणे मल्लिकार्जुन खर्गे यांना मान्यता दिली आहे. पक्षाचे इतर बडे नेते देखील हा निर्णय मान्य करतील, अशी अपेक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष “मल्लिकार्जुन खर्गे पोलिटिकल एंगेजमेंट विथ कंपॅशन, जस्टिस अँड इनक्लुझिव्ह डेव्हलपमेंट” या पुस्तकाच्या निमित्ताने ही बाब समोर आली आहे. यावेळी काही जणांनी खर्गे यांनी या गटाचे नेतृत्व करावे, असे मत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, या ऐतिहासिक लढतीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी खर्गे हेच योग्य आहेत.
सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘खर्गे यांनी नेहमीच पक्ष संघटनेला त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाच्या वर ठेवले आहे. आज त्यांनी काँग्रेस पक्षाला एका महत्त्वाच्या वळणावर उभे केले आहे. एक मजबूत संघटनात्मक नेता म्हणून, मल्लिकार्जुन खरगे नेतृत्व करण्यास योग्य आहेत.’
हे प्रमुख दावेदार
युतीतील पंतप्रधानपदासाठीचे चेहरे पाहिल्यास जेडीयूमधून नितीश यांचे समर्थक त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणत आहेत. आता या यादीत सपा प्रमुख अखिलेश यादव यांचेही नाव आले आहे. संयुक्त विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींना प्रक्षेपित केले जाईल, अशी अटकळ अनेकदा वर्तवली जात आहे.